सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; स्वच्छता, अग्निसुरक्षा व विसर्जन मार्गाच्या सुविधांवर भर
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजनांचा आढावा
जळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात *मा. आयुक्त आदित्य जिवने (भा.प्र.से)* यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत स्वच्छता, अग्निसुरक्षा, विसर्जन मार्ग, आरोग्य सुविधा, महिला स्वच्छतागृहे, अतिक्रमण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडप परिसरात स्वच्छता राखावी तसेच स्वच्छतेची जबाबदारी स्वतः घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. मंडळांनी कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेला सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
हॉकर्सना अतिक्रमण न करण्याच्या सूचना
गणेशोत्सवाच्या काळात विविध भागांत हॉकर्स व खाद्यपदार्थांच्या स्टॉलची संख्या वाढत असते. त्यामुळे हॉकर्सनी कचरा रस्त्यावर न टाकता परिसर स्वच्छ ठेवावा तसेच कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, याबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
मोठ्या गणेश मंडळांमध्ये फायर सेफ्टी मॉकड्रिल
गणेशोत्सवातील गर्दी आणि मंडपांची वाढती संख्या लक्षात घेता अग्निशमन विभागामार्फत मोठ्या गणेश मंडळांमध्ये फायर सेफ्टीबाबत जनजागृती तसेच मॉकड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, अग्निशामक यंत्राचा वापर, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची पद्धत याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे गणेशोत्सव काळात संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे.
*विसर्जन मार्गाची पाहणी; खड्डे, विद्युत वाहिन्या व झाडांच्या फांद्यांचा प्रश्न मार्गी*
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली असून, मार्गावरील खड्डे बुजविणे, धोकादायक विद्युत वाहिन्या व इतर अडथळे दूर करणे तसेच रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध गणेश मंडळांच्या ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित करण्याचे नियोजन करण्यात करण्यात येणार आहे.प्राथमिक उपचार व आवश्यक वैद्यकीय मदत नागरिकांना तत्काळ उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
गणेशोत्सवात महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षात घेऊन महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
*ॲम्बुलन्स, फर्स्टएड व मार्गदर्शक फलकांची व्यवस्था*
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ॲम्बुलन्स व फर्स्टएडची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गणेश विसर्जन मार्ग, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन सुविधा आणि इतर आवश्यक माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी मार्गदर्शक व माहिती देणारे फलक विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
*वॉच टॉवरचीही व्यवस्था*
गणेश विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वॉच टॉवरच्या व्यवस्थेबाबतही बैठकीत माहिती घेण्यात आली. उंच ठिकाणावरून गर्दीवर लक्ष ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीची माहिती तत्काळ संबंधित यंत्रणेला देणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
*गणेश मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे*
गणेशोत्सव हा उत्साह आणि श्रद्धेचा सण असून, तो स्वच्छ, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. स्वच्छता, अग्निसुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे,पंकज गोसावी, प्रकाश पाटील अग्निशमन अधिकारी अश्वजित घोडके, अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्यासह विवीध विभागांचे अधिकारी त्यासोबतच शहर वाहतूक निरीक्षक मुरेश्वर पेंदाम उपस्थित होते तर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे अध्यक्ष सचिन नारळे यांच्यासह किशोर देशमुख, सूरज दायमा, राहुल परकाळे, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, विकास चौधरी, बापू ठाकरे, अजय बत्तीसे, साई सराफ, रोहन महाजन, महेश चौधरी आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते