जळगावCrimeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कालिका माता चौफुलीवर अपघातांची मालिका; संतप्त जळगावकरांचा महामार्ग रोको, उड्डाणपुलाची जोरदार मागणी

कालिका माता, या प्रशासनाला सद्बुद्धी द्या ! नागरिकांची कालिका मातेच्या चरणी प्रार्थना


कालिका माता चौफुलीवर अपघातांची मालिका; संतप्त जळगावकरांचा महामार्ग रोको, उड्डाणपुलाची जोरदार मागणी

जळगाव : शहरातील कालिका माता चौफुली परिसरात सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे अखेर नागरिकांचा संयम सुटला असून सोमवारी सायंकाळी झालेल्या आणखी एका भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या या अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कालिका माता चौकात सोमवारी सायंकाळी ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी थेट महामार्गावर धाव घेत सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरली. त्यानंतर नागरिकांनी कालिका माता मंदिर परिसरात दीड तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान “तात्काळ उड्डाणपूल उभारावा”, “अपघातांची मालिका थांबवा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते सुरज नारखेडे, ललित नारखेडे , मुविकोराज कोल्हे यांच्यासह अनेक नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी विशेषतः जळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप केला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे आणि शनिपेठ पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.

नागरिकांनी सांगितले की, कालिका माता चौफुली हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि धोकादायक चौक बनला आहे. येथे वारंवार अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.

नागरिकांनी स्पष्ट इशारा देत, “तात्काळ उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला आहे. सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button