मध्य प्रदेशातील पार उमरटी येथे ४०० पोलिसांची धडक; अवैध शस्त्रनिर्मितीवर मोठा घाव, २ देशी कट्टे, ३२ संशयित वाहने जप्त.
प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्रतस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे सोमवारी पहाटे अंतरराज्यीय ‘ऑपरेशन कॉम्बिंग सर्च’ राबवत मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेत २ देशी कट्टे, ४ जिवंत काडतुसे, देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, साचे तसेच ३२ संशयित मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याशिवाय १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून २७ फरार आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले आहे.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, विविध उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते.
या मोहिमेसाठी ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि २० शासकीय वाहने तैनात करण्यात आली होती. पथक मध्यरात्री १ वाजता रवाना झाले असून पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत पार उमरटी परिसरात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.
कारवाईदरम्यान ४५ संशयित घरांची झडती घेण्यात आली. २० जणांची सखोल चौकशी करण्यात आली असून १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन संशयितांकडून २ देशी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
याशिवाय ३२ निनावी व महाराष्ट्र क्रमांकाच्या संशयित मोटारसायकली, तसेच देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल व साचे हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २७ फरार आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंगही केले असून भविष्यातील कारवाईसाठी त्याची नोंद ठेवण्यात आली आहे.
ही मोहीम चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध शस्त्रास्त्रांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी राबविण्यात आली होती. या कारवाईमुळे मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी आरोपी व शस्त्रसाठा हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.