शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हुतात्मा दिन अत्यंत शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पाळण्यात आला
जळगाव प्रतिनिधी : ३० जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज व महाविद्यालयांमध्ये शासकीय नियमांनुसार सकाळी ठीक अकरा वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी आपापल्या ठिकाणी उभे राहून शांततेत मौन पाळले. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षणकार्य सुरू असतानाही घंटा वाजताच सर्व हालचाली थांबवून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात देखील हुतात्मा दिन अत्यंत शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पाळण्यात आला. या वेळी प्राचार्यांच्या केबिनमध्ये उपस्थित असलेले विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी ज्या ज्या स्थितीत होते त्या स्थितीतच स्तब्ध उभे राहून दोन मिनिटे मौन पाळले. कोणतीही घोषणा न करता सर्वांनी स्वयंशिस्तीने हुतात्म्यांना नमन केले, हे विशेष ठरले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होत असून स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानाची जाणीव निर्माण होत असल्याचे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले. हुतात्म्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी सर्वत्र दिसून आली.