विद्यार्थ्यांची बुलेट दहशत, मोठ्या आवाजाने नागरिक त्रस्त; नावाजलेल्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा गल्लीबोळात गोंधळ; पोलीस प्रतिसादावर मोठे प्रश्नचिन्ह ?
मीनाताई ठाकरे मार्केट परिसरातील शाळेची शिस्त वर्गापुरतीच? फटाके सायलेन्सर ने परिसर दणाणला
जळगाव दि.4 जाने: शहरातील एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सजवळ सोमवारी दुपारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांनी बुलेट व मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर लावलेल्या दुचाकी गाड्या गल्लीबोळातून बेदरकारपणे फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. गाड्यांची रेस वाढवून फटाके फोडण्याची शर्यत लावली असावी असे दृश्य दिसले.
या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांकडून आमच्या प्रतिनिधीला कॉल आल्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा हा बेजबाबदार प्रकार दिसून आला. चौकशी केली असता, शेजारच्या एका नावाजलेल्या एज्युकेशन संस्थेत फेअरवेल कार्यक्रम असल्याचे समोर आले. फेअरवेलच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, वाहतूक नियम धाब्यावर बसवणे आणि रहिवाशांच्या शांततेचा भंग करणे, हा प्रकार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे संबंधित शाळा नर्सरीपासून दहावीपर्यंत ‘शिस्त, संस्कार आणि मूल्यशिक्षण’ देत असल्याचा दावा करते. मात्र, या विद्यार्थ्यांचे वर्तन पाहता शाळेत खरंच शिस्त नावाचा प्रकार शिकवला जातो की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
मीनाताई ठाकरे मार्केट परिसरात असलेल्या खाजगी बेकरी शॉप, स्नॅक्स कॉर्नर आहे , इथे ही मुले बिडी सिगारेट प्यायला येतात असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याच आजूबाजूच्या गल्लीबोळात हीच मुले वारंवार गाड्या वेगाने फिरवत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना भीतीचे वातावरण सहन करावे लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणा याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
परिसरातील रहिवाशांनी आता थेट शाळा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेकडे मागणी केली असून, या प्रकारावर तातडीने कठोर कारवाई करून भविष्यात अशा बेजबाबदार वर्तनाला आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
फेअरवेल हा आनंदाचा क्षण असतो; मात्र तो सार्वजनिक शिस्त मोडून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळून साजरा करणे, हे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
या प्रकाराची माहिती तत्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिली. मात्र, तब्बल ४० ते ४५ मिनिटांच्या विलंबानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन गेले. तोपर्यंत बहुतांश विद्यार्थी निघून गेले होते. कोणावर कारवाई झाली? किती वाहनांवर दंड ठोठावला? संबंधित एज्युकेशन संस्थेची माहिती काय? याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित होत आहे.