ताज्या बातम्या

राज्य नाट्यस्पर्धा आता संभाजीराजे नाट्यगृहातच! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या तत्पर निर्णयाने रंगकर्मींच्या उत्साहाला नवी ऊर्मी.


जळगाव  प्रतिनिधी : येत्या नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्र शासनाच्या कार्य संचालनालयातर्फे होणारी मराठी हौशी राज्य नाट्यस्पर्धा आता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी २४ ऑक्टोबर रोजी नाट्यगृहाची पाहणी करून रंगकर्मींशी चर्चा केली व स्पर्धेसाठी नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या निर्णयाने शहरातील रंगकर्मींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

मागील काही काळापासून नाट्यगृहाचा मक्ता खासगी संस्थेकडे होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे संस्थेने मक्ता सोडल्याने नाट्यगृह ओस पडले होते. त्यामुळे या वर्षीची हौशी नाट्यस्पर्धा कुठे होणार, असा प्रश्न रंगकर्मींमध्ये निर्माण झाला होता. यासाठी स्थानिक रंगकर्मींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, आणि अखेर त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी घुगे यांनी नाट्यगृहातील सुविधांची पाहणी करून तातडीने आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, “नाट्यगृहातील मूलभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जातील आणि स्पर्धा नियोजित वेळेत पार पडेल.”यावेळी कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता मुकेश सोनवणे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, रमेश भोळे, डॉ. वैभव मावळे, गौरव लवंगले, हर्षल पाटील, अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर आदी उपस्थित होते.

दरम्यान, नाट्यगृहाचा मक्ता आता कोण चालवणार, यावरही चर्चा रंगली असून रंगकर्मींच्या प्रतिनिधींची समिती नेमावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे म्हणाले, “जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा तत्परतेने निर्णय घेणारे ते पहिलेच जिल्हाधिकारी आहेत.”

या निर्णयामुळे जळगावच्या रंगभूमीला नवा जोम मिळाला असून, शहरातील रंगकर्मींच्या कलात्मकतेला नवसंजीवनी मिळणार आहे..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button