पोलीस मुख्यालयाच्या समोरच देशपांडे मार्केटची सार्वजनिक जागा पार्किंगसाठी आहे की, कोणाला झोपण्यासाठीची आरक्षित जागा ?
बेकायदेशीर पक्के बॅरॅकेट्स लावल्यामुळे, वाहन पार्किंग थेट रस्त्यावर पार्क !
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील पोलीस मुख्यालयाच्या समोर आणि नवीन बस स्टँड च्या बाजूलाच देशपांडे मार्केट आहे, तिथे असलेली वाहन पार्किंगची जागा सध्या उपयोगापेक्षा अडथळा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पार्किंगसाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागेत पक्के बॅरिकेट्स लावण्यात आल्याने वाहनचालकांना गाड्या रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत.
परिणामी, अर्धा रस्ता गाड्यांनी व्यापला जात असून या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण परिस्थिती शहर वाहतूक शाखा आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच घडत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
रात्री या मोकळ्या जागेत भिकारी किंवा काही लोक झोपत असावेत, मात्र दिवसा देखील पार्किंगचा उपयोग न होता ती जागा अडवून ठेवली जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पार्किंगसाठी असलेली जागा नेमकी कोणासाठी राखून ठेवली आहे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
पार्किंगच्या जागेत उभारलेले पक्के बॅरिकेट्स नेमके कोणी आणि कोणत्या परवानगीने लावले, याबाबत महानगरपालिकेने तात्काळ स्पष्टता देणे आवश्यक आहे.