Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!


प्रतिनिधी:  जळगाव शहर महानगरपालिकेतील अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची एक तातडीची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत शहरातील विविध समस्यांवरून महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेषतः रिंग रोडची दुरवस्था, अतिक्रमण विषयावरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

रिंग रोडवरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत महापौरांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी (पीडब्ल्यूडी) या विषयाकडे गंभीरतेने पाहत नाहीत. बैठकीला बोलावले तरी ते येत नाहीत आणि फोनवर केवळ उडवाउडवीची उत्तरे देतात. रिंग रोडवर झालेल्या अनेक अपघातांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, तेथील नगरसेवकांना जनतेला उत्तरे देणे कठीण झाले आहे,” अशा शब्दांत महापौरांनी संताप व्यक्त करत, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक भूमिका घेण्याचे निर्देश दिले.

शहरातील अतिक्रमणाचा आढावा घेताना महापौर म्हणाल्या, “एकदा अतिक्रमण उचलले की ते पुन्हा का होते? अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा वचक का नाही?” फेरीवाल्यांना पट्ट्या आखून देऊन किंवा पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्याच्या कामात दिरंगाई का होत आहे, असा जाब त्यांनी विचारला. जळगावचे रस्ते मोकळे झालेच पाहिजेत, असे सांगतानाच शहरात झोनवाईज ‘पार्किंग लॉट’ उभारता येतील का, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अतिक्रमण विभागातील अपुऱ्या मनुष्यबळासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

 

*कामचुकार जुन्या ठेकेदारांना डच्चू द्या!*

“महापालिकेची कामे जे प्रामाणिकपणे आणि वेळेत पूर्ण करतील, त्यांनाच यापुढे कामे द्या. कामे रेंगाळत ठेवणाऱ्या जुन्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करा आणि नवीन ठेकेदारांना संधी द्या,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. यासोबतच शहरातील बेशिस्त रिक्षांना शिस्त लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 मनपाच्या शहरातील पडीत असलेल्या जागा विकसित करून महापालिकेचा महसूल कसा वाढवता येईल, याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.

साने गुरुजी ग्रंथालय: ग्रंथालयाजवळ सुरू असलेल्या बांधकामाची माहिती दिली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या जागेचा विद्यार्थ्यांसाठी कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, याची माहिती घेण्यास सांगितले.चौक सुशोभीकरण व खड्डे: शहरातील खड्ड्यांची डागडुजी अद्याप अपूर्ण असल्याबद्दल आणि चौक सुशोभीकरणाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या विकासकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजू लाकूडझोडे, शहर अभियंता योगेश बोरोले, नगर रचना विभागाचे अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button