Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

जळगावात गिरणा टाकी परिसरातील बुधवारी सायंकाळी चर्चच्या रस्त्यावर अल्पवयीन चालकाचा थरार; ९ जण जखमी, अल्पवयीन वाहनचालक व कार बाजारच्या मालकासह गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये. पालकांना पोलीस प्रशासनाचे आवाहन


जळगाव : रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळच्या सुमारास घडलेल्या गंभीर अपघात प्रकरणात अल्पवयीन चालकाविरोधात तसेच त्याला वाहन चालवण्यासाठी कार उपलब्ध करून देणाऱ्या कार बाजार मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तब्बल ९ नागरिक जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांचे एमएलसी प्राप्त झाले आहेत. एका जखमीला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस माहितीनुसार,अल्पवयीन मुलाने गिरणा टाकी परिसरातील चर्च च्या रस्त्यावर चारचाकी वाहन बेकायदेशीर, निष्काळजी व बेदरकारपणे चालवत अनेक नागरिकांना धडक दिली. या प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर तसेच वाहन उपलब्ध करून देणाऱ्या कार बाजारचे मालक रमेश राजवाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलांना यापूर्वीही वाहन चालवण्यासाठी कार दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी कार बाजाराचे परवाना (लायसन्स) रद्द करण्याचा प्रस्तावही संबंधित विभागाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः संबंधित अल्पवयीन मुलांच्या पालकांना कार्यालयात बोलावून घेतले. त्यांनी पालकांना या प्रकाराचे गांभीर्य समजावून सांगत मुलांवर लक्ष ठेवण्याच्या आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालवू न देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शाळा व महाविद्यालये सुरू होत असताना कोणत्याही परिस्थितीत अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये. समाजात जनजागृती व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळल्या जाव्यात यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात मोटार वाहन कायद्यातील कलम 199A, कलम 180 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 281 आणि 125 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दोषींना दंड व कारावासाची तरतूद आहे. पुढील तपास प्रशांत पाठक करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button