शहरातील शाहूनगर ते उर्दू शाळा परिसरात महापौरांची धडक; अधिकारी-कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती!
प्रतिनिधी जळगाव : महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत गुरुवारी (२२ ऑक्टोबर) वार्ड क्रमांक ६ मधील शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळा परिसराची अचानक पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आणि कडक कारवाईचे निर्देश दिले.
ट्रॅफिक गार्डन परिसरात उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा उचलण्याचे काम सुरू असताना, यापुढे परिसरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास प्रथम नोटीस आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले.
शाहूनगर येथील पाणीपुरवठा विभागास भेट दिली असता एकच कर्मचारी उपस्थित आढळला व इतर कर्मचारी इतर कामावर असल्याचे दिसून आले. यावर महापौरांनी हालचाल रजिस्टर तपासून शाहूनगर भागातील सर्व पाण्याचे कनेक्शन आणि तोट्या तात्काळ दुरुस्त करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.
उर्दू शाळेतील अनागोंदीवर संताप
उर्दू शाळा क्रमांक १२ ची संरक्षण भिंत तुटलेली असून तेथे काही नागरिक भंगार गोळा करत असल्याचे निदर्शनास आले. परिसराचा मोठा भाग वापरविना पडल्याचे पाहून महापौरांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडून तातडीने लेखी स्पष्टीकरण मागितले.
शाहूनगर मार्केटमधील दुकानदारांना दुकानासमोर डस्टबिन ठेवण्याची सक्ती करण्यात आली असून ट्रॅफिक गार्डन परिसरात कचरा टाकल्यास दंडाची तंबी देण्यात आली. तसेच, रस्त्यावर धूळ खात बंद पडलेल्या रिक्षा आणि बॉम्बे बिर्याणीसह इतरांचे बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवून भंगार म्हणून जप्त करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले असून परिसरातील गटारी मोकळ्या करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेवक दीपक सूर्यवंशी, ॲड. शुचिता हाडा, अर्शीनबानो खाटीक यांच्यासह शहर अभियंता आर. टी. पाटील, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.