पाणीपुरवठ्यातील लिकेज, कमी दाब आणि टाक्यांच्या दुरवस्थेवर सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे कडक आदेश; पाण्याचा अपव्यय रोखून नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश!
प्रतिनिधी जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्या, पाण्याच्या टाक्यांची सद्यस्थिती व दुरवस्था, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता, पाणी साठवण व वितरण व्यवस्था, वॉटर मीटर बसविताना होणारे लिकेज आणि नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्यात आले.
शहरातील अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी मिळणे, जलवाहिन्यांमधील गळती, वॉटर मीटर बसविताना होणारी पाण्याची गळती तसेच मीटर बसविल्यानंतर वारंवार उद्भवणाऱ्या लिकेजच्या समस्यांकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असून, काही भागांत नागरिकांना कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तक्रारी वाढत आहेत. या समस्यांची गांभीर्याने दखल घेत वॉटर मीटर बसविताना होणारी गळती तातडीने थांबवावी, वारंवार होणाऱ्या लिकेजचे कायमस्वरूपी निराकरण करावे आणि नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी, असे कडक आदेश सभापती डॉ. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच पाण्याच्या टाक्यांची सद्यस्थिती व दुरवस्था तपासून आवश्यक देखभाल-दुरुस्ती करावी, टाक्यांची नियमित स्वच्छता राखावी आणि पाणी साठवण व वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, असे आदेश देण्यात आले. जलवाहिन्यांमधील गळती बंद करून पाण्याचा अपव्यय रोखणे, पाणी वितरणाचे योग्य नियोजन करणे आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे यावरही भर देण्यात आला. कामकाजात हलगर्जीपणा न करता नागरिकांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने उपाययोजना करण्याचे आदेश सभापतींनी दिले.
कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची जपणूक
कमी पावसामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे महत्त्व लक्षात घेता, उपलब्ध पाण्याची जपणूक करून त्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख घृष्णेश्वर साळुंखे, अभियंता सचिन अमृतकर, राम वाळके, धम्मरत्न बाविस्कर व दीपक चौधरी उपस्थित होते.