मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून २ लाखांचा धनादेश सुपूर्द
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर : महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला.
दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या मदत योजनांसोबतच समाजातील सक्षम घटकांनीही सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, या भावनेतून हा निधी देण्यात आला.
दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी उद्योजक, व्यापारी, दानशूर नागरिक, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच सक्षम व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. “संकटाच्या काळात शासनाचा हात आणि समाजाची साथ एकत्र आली, तर अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो,” असे त्यांनी सांगितले.