ताज्या बातम्या

जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक दिन उत्साहात साजरा


जळगाव, दि. २२ : वाहनचालक हा वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून, वाहन चालविताना शिस्त, दक्षता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. अपघातमुक्त प्रवासासाठी चालकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याने त्यांच्या कर्तव्यभावनेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चालक दिन साजरा केला जातो. यानिमित्त जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश ताटू, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड, प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर इंगळे, कार्यालय अधीक्षक अनिल ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चालक दिनानिमित्त कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच परिवहन कार्यालयातील वाहनचालकांसह पक्की व अवजड वाहन चालविण्याच्या चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांची शारीरिक व नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय २३ वाहनचालकांनी एचआयव्ही तपासणी करून घेतली.

या उपक्रमासाठी टीसीआय फाऊंडेशन, जळगाव तसेच गळवलकर चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश ताटू आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत यापुढेही विविध जनजागृतीपर व आरोग्यविषयक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रस्ता सुरक्षा आणि अपघातमुक्त वाहतुकीसाठी नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button