१० हजारांच्या लाचेचा हिशेब १२ वर्षांनी चुकता; नाशिकच्या पोलीस हवालदाराला ७ वर्षांचा कारावास
२०१४ ची लाचखोरी अखेर भोवली; रंगेहाथ पकडलेल्या पोलीस हवालदाराला अखेर कारावास.
नाशिक, दि. ११ सप्टें | गुन्ह्यातील आरोपींना अटक करून पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी लाच मागत स्वीकारणाऱ्या नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत एकूण ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी रामचंद्र राजराम आडके, पोलीस हवालदार, वर्ग-३, नाशिक तालुका पोलीस स्टेशन असे त्यांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाशिक तालुका पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात मूळ तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी आडके यांनी २३ सप्टेंबर २०१४ रोजी पंच साक्षीदारासमक्ष १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार २४ सप्टेंबर २०१४ रोजी गिरणारे आऊट पोस्ट येथे पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आडके यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पदाचा गैरवापर करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तपास पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कलम ७ अंतर्गत ३ वर्षे, तर कलम १३(२) अंतर्गत ४ वर्षे शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे, कोर्ट क्रमांक ४, नाशिक यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत रामचंद्र राजराम आडके यांना दोषी ठरवण्यात आले.
न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अंतर्गत ३ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम १३(२) अंतर्गत ४ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ४ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गोरवाडकर यांनी कामकाज पाहिले.
या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे तसेच कोर्ट पैरवी अंमलदार पोहवा/५०२ श्री. प्रदिप काळोगे, पोलीस हवालदार/१०३४ प्रभाकर गवळी, पोलीस हवा / २९०३ किरण धुळे यांनी कामकाज केले आहे.
लाच मागितल्यास निर्भीडपणे तक्रार करा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधता येतो.