Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

गिरणा टाकी परिसरातील श्याम प्लाझा अपार्टमेंटच्या सामाईक जागेत ‘गुजरात वाला’चे बेकायदेशीर शेड; आठ जणांना मनपाचा इशारा

अनधिकृत बांधकाम करून व्यवसाय थाटला; ‘गुजरात वाला’ मनपाच्या रडारवर


जळगाव : गिरणा टाकी परिसरातील सुयोग कॉलनी  भागातील श्याम प्लाझा अपार्टमेंटच्या सामाईक जागेत पार्किंगसाठी असलेल्या जागेचा वापर करून मोठे शेड उभारण्यात आल्याप्रकरणी जळगाव शहर महानगरपालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. नगर भूमापन क्रमांक ६७०९ येथील या बांधकामाबाबत महापालिकेने संबंधित रहिवासी तसेच भाडेकरूला १५ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या नोटीसमध्ये प्रेमराज घनश्याम राणे, स्मिता रवींद्र राणे, राजेंद्र रवींद्र राणे, पूजा पंकज चौधरी, स्नेहल कमलेश पाटील, कल्पना सुधाकर राणे, देवेंद्र सुधाकर राणे, गोरी स्वप्नील कुरकुरे यांच्यासह विजय शेठ मदानी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती या अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असून विजय शेठ मदानी हे भाडेकरू असल्याचे सांगण्यात येते.

सदर अपार्टमेंटमधील पार्किंगच्या काही सामाईक जागेत मोठे शेड उभारण्यात आल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. या शेडचा वापर ‘गुजरात वाला’ या नावाने वाणिज्यिक कारणासाठी केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांच्या सामाईक वापरासाठी असलेल्या जागेचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी आहे का, तसेच सदर शेड उभारण्यासाठी महापालिकेची बांधकाम परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महापालिकेच्या नोटीसमध्ये संबंधित बांधकाम हे मंजूर बांधकाम परवानगीच्या अटींनुसार आहे का किंवा परवानगीशिवाय करण्यात आले आहे का, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच सामाईक जागेत उभारलेल्या शेडचा वापर व त्यासंदर्भातील आवश्यक परवानग्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 अन्यथा कारवाई महापालिकेने संबंधितांना १५ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याची मुदत दिली आहे. विहित मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ व ५४ अन्वये पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, अपार्टमेंटच्या सामाईक पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्यासाठी शेड उभारण्यात आल्याच्या या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सामाईक जागेवर उभारलेले शेड नेमके कोणाच्या परवानगीने उभारण्यात आले, त्याला बांधकामाची मंजुरी आहे का आणि ‘गुजरात वाला’ या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबत आता संबंधितांकडून दिल्या जाणाऱ्या खुलाशाकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या कारवाईमुळे सामाईक जागेचा वापर आणि अनधिकृत बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, खुलासा मिळाल्यानंतर प्रशासन पुढील कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button