Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

गांधी मार्केट तळघरातील पाण्याचा उपसा पूर्ण; ड्रेनेज चोक कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मनपाची विशेष मोहीम

आयुक्त आदित्य जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस १२-१२ तास मोहीम; रेडिओ डिटेक्शन सिस्टमद्वारे भूमिगत चेंबरचा शोध


प्रतिनिधी जळगाव: शहरातील गांधी मार्केट परिसरातील सुमारे २० ते २५ वर्षे जुन्या व्यावसायिक संकुलाच्या तळघरात अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्याचा प्रश्न अखेर जळगाव महानगरपालिकेने युद्धपातळीवर हाताळला आहे. आयुक्त आदित्य जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दोन दिवस सलग १२-१२ तास सक्शन मशीनच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात आला असून तळघर पूर्णपणे पाणीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पाण्याचा उपसा पूर्ण झाल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत तळघराखालील भूमिगत ड्रेनेज लाईन चोक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मूळ कारण दूर करण्यासाठी प्रथम पाणी काढणे आवश्यक होते. त्यानंतर आधुनिक रेडिओ डिटेक्शन सिस्टमच्या सहाय्याने भूमिगत ड्रेनेज चेंबरचा शोध घेण्यात आला असून त्यातही यश मिळाले आहे. आता संबंधित चेंबर उघडून त्याची साफसफाई करण्यात येणार असून चोक झालेली ड्रेनेज लाईन सुरळीत करून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.

ही संपूर्ण मोहीम स्वच्छता अभियंता समीर बोरोले यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आली. स्वच्छता मुख्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, तांत्रिक कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि यंत्रसामग्री पथकाने समन्वयाने काम करत अल्पावधीत मोठे काम पूर्ण केले.

गांधी मार्केटमधील व्यापारी आणि नागरिकांना अनेक दिवसांपासून तळघरात साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मनपाच्या या कारवाईमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असून, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ही समस्या कायमस्वरूपी निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जळगाव महानगरपालिकेने नागरिक व व्यापाऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याची भूमिका कायम ठेवत प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सर्व व्यापारी व नागरिकांचे आभारही मानले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button