मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची व्यापक मोहीम; ४७ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण.
प्रतिनिधी जळगाव, दि. २८ जुलै : पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू व इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरभर विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत घरभेटी, कंटेनर सर्वेक्षण, पंप व धूर फवारणी (फॉगिंग) तसेच जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. २४ जुलैपर्यंत ४७,७०६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १,३३० घरांमध्ये व १,७९९ पाण्याच्या कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. १.३६ लाखांहून अधिक पाण्याच्या भांड्यांची तपासणी करून सुमारे ९९ हजार अनुपयोगी कंटेनर रिकामे करण्यात आले.
मनपाने सर्व १९ प्रभागांमध्ये पंप फवारणी व फॉगिंग मोहीम राबविली असून नागरिकांना आठवड्यातून एक दिवस “ड्राय डे” पाळणे, पाणी साचू न देणे आणि ताप अथवा डेंग्यूसदृश लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. आयुक्त आदित्य जिवने यांनीही या मोहिमेस नागरिकांनी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.