Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

४० वर्षांच्या अनुभवी चालकांना ३० वर्षीय प्रशिक्षकाचे धडे; महाराष्ट्रात अशी पद्धत फक्त जळगावातच?

अनिवार्य प्रशिक्षणाचा अधिकृत आदेश जाहीर करा; चालकांचा आरटीओला सवाल?


जळगाव : जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहनचालकांचे लायसन्स नूतनीकरण करण्यापूर्वी दर गुरुवारी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये अपघातांची प्रमुख कारणे, वाहतूक नियम, रस्ते संकेतचिन्हे आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. मात्र या प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेबाबत अनुभवी चालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आरटीओ निरीक्षकांकडून घेण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणात अपघात होण्यामागील अपुरी झोप, अतिवेग, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन यांसारख्या कारणांवर भर दिला जातो. तसेच इंडिकेटरचा योग्य वापर, हायवेवरील त्रिकोणी, चौकोनी व गोल आकारातील संकेतचिन्हांचा अर्थ, विश्रामगृह, हॉटेल, पेट्रोल पंप, स्पीड ब्रेकर, घाट रस्ता, रेल्वे क्रॉसिंग, नो पार्किंग, यू-टर्न, वेगमर्यादा अशा विविध फलकांची माहिती दिली जाते.
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रशिक्षण निश्चितच महत्त्वाचे असले, तरी याच प्रशिक्षणात अनेक अनुभवी चालकांनी धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ३५ ते ४० वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असलेल्या अनेक चालकांचे म्हणणे आहे की, प्रशिक्षणात सांगितले जाणारे जवळपास ९५ टक्के नियम त्यांना आधीपासूनच माहित आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या चालकांनी तर केवळ या प्रशिक्षणासाठी पूर्ण दिवस खर्ची पडत असल्याची खंत व्यक्त केली.
याचवेळी अनेक चालकांनी आणखी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील इतर कोणत्या आरटीओ कार्यालयांमध्ये ट्रान्सपोर्ट किंवा अवजड वाहनांच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी अशाच प्रकारचे अनिवार्य रस्ता सुरक्षा प्रशिक्षण दिले जाते का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जळगावमध्ये राबविण्यात येणारी ही पद्धत राज्यभर एकसमान आहे की स्थानिक स्तरावरील निर्णय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यासोबतच परिवहन विभागाकडून अशा प्रशिक्षणाबाबत कोणते अधिकृत परिपत्रक, शासन निर्णय किंवा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत का, अशी विचारणाही वाहनचालकांकडून केली जात आहे. जर अशा प्रकारच्या सूचना अस्तित्वात असतील, तर त्या सार्वजनिक कराव्यात, जेणेकरून चालकांमधील संभ्रम दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आज वाहन परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर ‘फेसलेस’ आणि ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अर्ज, कागदपत्रे आणि शुल्क प्रक्रिया ऑनलाइन होत असताना प्रत्यक्ष उपस्थित राहून दिवसभर प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे, असा प्रश्नही चालक उपस्थित करत आहेत. ऑनलाइन प्रणालीचा उद्देश नागरिकांचा वेळ आणि प्रशासनाचा ताण कमी करणे हा असताना, प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सक्ती त्याच उद्देशाला काही प्रमाणात छेद देत असल्याची भावना काही वाहनचालकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतो कि अनेक दशकांचा प्रत्यक्ष वाहनच चालवण्याचा अनुभव असलेल्या चालकांना सर्वांसाठी एकसारखे प्रशिक्षण देणे कितपत आवश्यक आहे? “अनेक वर्षांपासून गाडी चालवणाऱ्या चालकांसाठी वेगळी परीक्षा किंवा फक्त नवीन नियमांची थोडक्यात माहिती देण्याची व्यवस्था करता येणार नाही का, असा प्रश्न चालकांकडून उपस्थित केला जात आहे.”
याचबरोबर काही चालकांनी प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वयाचाही मुद्दा उपस्थित केला. “प्रशिक्षकाचे वय ३० वर्षे आणि आमचा वाहन चालवण्याचा अनुभव ४० वर्षांचा,” अशी भावना व्यक्त करत अनुभवाचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याकडे दुसऱ्या बाजूने पाहिले तर प्रशिक्षण हे व्यक्तीच्या वयावर नव्हे, तर अद्ययावत वाहतूक नियम, नवीन कायदे आणि सुरक्षित वाहनचालनाच्या बदलत्या निकषांची माहिती देण्यासाठी असते, हेही तितकेच वास्तव आहे.
खरे पाहता, वाहतूक नियम वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे अनुभवी चालकांनाही नव्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वर्षांचा अपघातमुक्त अनुभव असलेल्या चालकांसाठी सध्याची एकसारखी प्रशिक्षण पद्धत अधिक परिणामकारक, वेळेची बचत करणारी आणि तंत्रज्ञानाधारित कशी करता येईल, याचा विचार आरटीओ प्रशासनाने करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
रस्ता सुरक्षा हा तडजोडीचा विषय नाही. मात्र सुरक्षिततेसोबतच चालकांच्या वेळेची, अनुभवाची आणि सोयीचीही दखल घेतली, तसेच या प्रशिक्षणामागील कायदेशीर आधार, राज्यभरातील अंमलबजावणी आणि ऑनलाइन प्रक्रियेशी त्याचा मेळ याबाबत पारदर्शकता ठेवली, तर ही प्रक्रिया अधिक परिणामकारक, विश्वासार्ह आणि स्वीकारार्ह ठरू शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button