ताज्या बातम्या

मनपाच्या टीबी सेंटर परिसरात महिनाभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत वाहन; कचरा न काढताच वाहन पार्क, पावसामुळे गंजण्यास झाली सुरुवात.


जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीबी सेंटर परिसरात कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या देखभालीबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. या ठिकाणी शहरातील घंटागाड्या व इतर कचरा संकलन वाहने सकाळी येथून कामासाठी रवाना होतात आणि रात्री पुन्हा याच परिसरात पार्क केली जातात. परिसराला गुरुवारी गुरुवारी भेट दिल्यानंतर काही धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या.
परिसरात एक मोठे कचरा संकलन वाहन दुरुस्तीसाठी उभे असल्याचे आढळले. मात्र या वाहनातील कचरा खाली न करता ते तसेच पार्क करण्यात आले होते. पावसाळ्यात वाहनातील कचऱ्यावर थेट झाडे उगवली असून, साचलेल्या पाण्यामुळे वाहनाला गंज लागण्यासही सुरुवात झाली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वाहन जवळपास महिनाभरापासून याच अवस्थेत उभे आहे.
दुरुस्तीसाठी वाहन बंद ठेवणे ही एक बाब असली, तरी त्यातील कचरा न काढणे आणि पावसात वाहनाची कोणतीही देखभाल न करणे ही गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणाची बाब मानली जात आहे. लाखो रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली वाहने अशा प्रकारे उघड्यावर पडून राहिल्यास त्यांचे आयुष्य कमी होण्याबरोबरच भविष्यात ती भंगारात काढण्याची वेळ येऊ शकते.
वाहनाची दुरुस्ती नेमकी का रखडली, त्यासाठी आवश्यक खर्च किती आहे, दुरुस्तीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत का, याची माहिती संबंधित वाहन विभागाकडेच उपलब्ध असू शकते. मात्र, वाहनातील कचरा तसाच ठेवून महिनाभर पार्क करून ठेवणे हे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरत नाही.
याच परिसरात इतर काही जुनी वाहनेही दीर्घकाळापासून उभी असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशाच प्रकारची परिस्थिती इतर वाहनांचीही आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या परिसरात रस्त्याची फार बिकट अवस्था आहे सर्वत्र चिखल बघायला मिळाला. दरवर्षी मुरूम टाकण्याऐवजी कायमस्वरूपी रस्ता करायला हरकत नाही. चिखल युक्त रस्त्यामुळे वाहने लवकर खराब होतात.महापालिकेच्या संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी, तसेच नागरिकांच्या करातून खरेदी केलेल्या वाहनांचे योग्य संरक्षण व देखभाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button