ताज्या बातम्या

समता सैनिक दलाचा जामनेर तालुक्यात संघटनात्मक दौरा उत्साहात; गावागावांत संघटन विस्ताराला नवी दिशा


जामनेर (प्रतिनिधी): समता सैनिक दलाचा जामनेर तालुक्यातील नियोजित संघटनात्मक दौरा राज्य संघटक विजय निकम यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दौऱ्यादरम्यान गाडेगाव, देवपिंपरी, पालधी, पिंपळगाव, पहूर, हिवरखेडा, सोनाळा आणि नेरी या गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच संघटन अधिक सक्षम करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करून पुढील वाटचालीचे नियोजन करण्यात आले.

या दौऱ्यात प्रचारक गौतम सोनवणे, अनिताताई कापुरे, लक्ष्मीबाई मोरे, मोनाताई धीवर यांच्यासह मनोज बाविस्कर, राहुल निकम, मधुकर सुरवाडे, जय निकम, सरलाबाई लोखंडे, रवी खरे आणि रितेश सोनवणे यांनी सहभाग घेतला. प्रत्येक गावातील बैठकीत संघटनात्मक बांधणी, वैचारिक प्रबोधन, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दौऱ्यादरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. युवक व महिलांचा सहभाग वाढविणे, नियमित वैचारिक प्रशिक्षण शिबिरे, संघटनात्मक बैठका आणि सामाजिक जनजागृती अभियान राबविणे, तसेच अन्यायग्रस्तांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणारी संघटना उभारण्यावर विशेष भर देण्यात आला.

या दौऱ्यामुळे जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून समता सैनिक दलाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. “शिकवा • चेतवा • संघटित करा” या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि भारतीय संविधानातील मूल्यांच्या संरक्षणासाठी गावागावांत सक्षम व शिस्तबद्ध संघटना उभारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button