आरोग्य विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश; शहर स्वच्छतेवर उपमहापौरांचा भर
शहर स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही;
प्रतिनिधी : जळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक शिस्त आणि कार्यक्षमतेसाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत गैरहजर कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. उपमहापौर दालनात झालेल्या या बैठकीला उपायुक्त गायकवाड, समीर बोरोले सर्व स्वच्छता निरीक्षक (SI), मुख्य स्वच्छता निरीक्षक (CSI) तसेच स्वच्छता मक्तेदार संस्थेचे सुपरवायझर उपस्थित होते. बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी झाडू कामगार, नाली सफाई कर्मचारी आणि स्वच्छता विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विशेष नाराजी व्यक्त केली. सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित झाडलोट, नाली सफाई, कचरा संकलन आणि स्वच्छता कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यावर भर देण्यात आला.उपमहापौर चौधरी यांनी स्पष्ट केले की, नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. स्वच्छतेच्या कामात कोणताही निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
बैठकीच्या शेवटी शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मक्तेदारांनी समन्वयाने काम करून स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले.