प्रोत्साहन अनुदानाचे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वितरण; पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन सहभागी होणार.
जैन हिल्स येथे आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम
जळगाव, दि.18 (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) अंतर्गत देशभरात आयोजित विशेष कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जळगावातही उद्या, 19 जून रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), जळगाव कार्यालयातर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या जैन हिल्स येथील गांधी तीर्थ परिसरातील कस्तुरबा सभागृहात सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन सहभागी होऊन देशभरातील लाभार्थ्यांना सुमारे 2,400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित करणार आहेत.जळगावातील प्रादेशिक कार्यक्रमास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ आणि जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी आणि सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांचीही उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थित राहणार आहेत.
PM-VBRY ही रोजगारनिर्मितीला चालना देणारी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, संघटित क्षेत्रात प्रथमच रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल 15 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. यासोबतच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळतो.
या योजनेद्वारे पुढील दोन वर्षांत देशभरात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात आतापर्यंत 75 हजार 711 कर्मचाऱ्यांना 42.79 कोटी रुपयांहून अधिक लाभ वितरित करण्यात आला असून 6 हजार 351 नियोक्त्यांना 145.16 कोटी रुपयांपेक्षा अधिक प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे.
देशभरातील सुमारे 200 ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या या कार्यक्रमात 9 हजारांहून अधिक नियोक्ता प्रतिनिधी आणि 45 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. रोजगारनिर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना या कार्यक्रमातून अधिक बळ मिळणार असल्याचे विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी आणि सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी सांगितले आहे. तसेच प्रादेशिक परिसरातील लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.