नीट परीक्षेचे 21 जून रोजी आयोजन; परीक्षेदरम्यान 100 मीटर परिसरात प्रवेशबंदी
जळगाव, दि. 18 : जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर नीट (यूजी) परीक्षा दि. 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून, परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात नीट (यूजी) परीक्षेसाठी एकूण 12 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा काळात केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, 21 जून रोजी परीक्षा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानेही संबंधित कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तातडीच्या परिस्थितीमुळे हा आदेश एकतर्फी जारी करण्यात आला असून, त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.