ताज्या बातम्या

भुसावळात पहाटेपासून पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’; २३ संशयित वाहने जप्त, गावठी कट्टा व तलवारी हस्तगत!


भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाने भुसावळ शहर व परिसरात बुधवारी (दि. १० जून २०२६) पहाटे मोठ्या प्रमाणावर विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत संघटित गुन्हेगारी, सराईत गुन्हेगार, इराणी गँग्स तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई केली. पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेदरम्यान झालेल्या या मोहिमेसाठी तब्बल २० अधिकारी, २०० पोलीस अंमलदार आणि ५ आरसीपी प्लाटून तैनात करण्यात आले होते.

गुन्हेगारांना बेसावध अवस्थेत पकडणे, त्यांची पडताळणी करणे आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता. कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक संशयितांच्या घरांवर झडती घेतली, वाहनांची तपासणी केली तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलीस पथकांनी एकूण ९९ आरोपी व संशयितांची तपासणी केली. याशिवाय ६३ संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. अनेक सराईत गुन्हेगारांची चौकशी करून त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले.

विशेष नाकाबंदी आणि तपासणी मोहिमेदरम्यान ११२ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मालकी व कागदपत्रांबाबत संशय असलेल्या २३ वाहनांना पुढील चौकशीसाठी जप्त करण्यात आले.या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी १ गावठी कट्टा, १ जिवंत काडतूस, २ तलवारी आणि १ कोयता जप्त केला. या प्रकरणी आर्म्स ॲक्टअंतर्गत एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हातभट्टीवरही कारवाईदरम्यान चोपडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ८४/२०२६ मधील चोरीची एक दुचाकी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. तसेच भुसावळ शहरालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर तीन स्वतंत्र कारवाया करून सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोठ्या प्रमाणावरील रसायनही नष्ट करण्यात आले.खंडवा (मध्यप्रदेश) येथील जीआरपी पोलिसांना हवा असलेला एक आरोपीही या मोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आला असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे भुसावळातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भुसावळ शहरात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनकडे जिल्हाभराचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button