जळगावात रस्ता सुरक्षा मोहिम तीव्र; १०० कर्कश सायलेन्सर व २५० फॅन्सी नंबर प्लेट नष्ट
सायलेन्सरची धडधड… पोलिसांनी केली ‘सायलेन्स’!”
जळगाव, प्रतिनिधी — शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषण व वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणारे तब्बल १०० दुचाकी सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. हे सायलेन्सर संबंधित कंपनीचे नसून, वाहन खरेदीनंतर बाहेरून बसविलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना या कर्कश आवाजाचा मोठा त्रास होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेले सायलेन्सर आज मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार रोड रोलरच्या सहाय्याने चेपून निकामी करण्यात आले.
याशिवाय, शहरात अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात आली. एकूण २५० फॅन्सी नंबर प्लेट जप्त करून त्यांचाही नाश करण्यात आला.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. सन २०२५ मध्ये एकूण ९३९ अपघात झाले असून त्यापैकी ४५० प्राणघातक अपघातांत सुमारे ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
ही पथके विना हेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, अल्पवयीन चालक, रॅश ड्रायव्हिंग, नो पार्किंग, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईड ड्रायव्हिंग, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे तसेच कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याला ‘शून्य प्राणहानी’च्या दिशेने नेण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीमार्फत जनजागृती व कठोर कारवाईचा दुहेरी उपक्रम राबविण्यात येत आहे.