लोक टाईम न्यूज’च्या वृत्ताचा परिणाम : मनपाचा कडक आदेश, मनपाच्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांची थेट नजर
कामचुकार मनपा कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांची राहणार नजर; वार्डनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी : शहरातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत ‘लोक टाईम न्यूज’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध करून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मागील आठवड्यात महापौरांनी स्वतः कर्मचारी व अधिकाऱ्यांची हजेरी तर तपासली होती, पण त्या कर्मचाऱ्यांचा काय जे फक्त हजेरी लावतात पण काम वेगळीकडे करतात , या वृत्ताचा प्रभाव पडताच मनपा प्रशासनाने तातडीने दखल घेत सफाई कामगारांच्या उपस्थिती आणि कामकाजाबाबत कडक आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, शहरातील दैनंदिन साफसफाईबाबत सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, बहुतांश सफाई कामगार कामावर येत नसल्याच्या, पूर्ण वेळ काम करत नसल्याच्या तसेच हजेरी लावून अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
शहरातील दैनंदिन साफसफाईची वेळ सकाळी ६.०० ते दुपारी २.०० अशी निश्चित करण्यात आली असून, सकाळी ७.०० वाजेपर्यंत आणि दुपारी १.०० वाजता हजेरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक १ ते १९ साठी मनपा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त अधिकाऱ्यांना दररोज संबंधित आरोग्य विभागाच्या युनिट कार्यालयाला भेट देऊन कायमस्वरूपी व मक्तेदार सफाई कामगारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कामगारांनी ड्रेस कोड व ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. हजेरी रजिस्टरमधील उपस्थितीची खात्री करून गैरहजर किंवा रजेवर असलेल्या कामगारांचा दैनंदिन अहवाल सहाय्यक आयुक्तांमार्फत उपायुक्त कार्यालयात सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
‘लोक टाईम न्यूज’च्या वृत्तानंतर प्रशासनाने तातडीने घेतलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, आता प्रत्यक्ष तपासणीमुळे गैरहजर राहणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे शहरातील साफसफाई व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.