जळगाव रेल्वे स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर शौचालयांची बिकट अवस्था; महिलांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव प्रतिनिधी: जळगाव रेल्वे स्टेशन हे खानदेशातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र मानले जाते. मात्र याच स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व वरील शौचालयांची अवस्था अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
या प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक शौचालयाला दरवाजाच नसल्याने ते शौचालय कमी आणि उघड्यावरचा प्रकार अधिक वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही प्रवासी मजबुरीपोटी उघडपणे लघुशंका करताना दिसतात. विशेष म्हणजे याच ठिकाणी महिला प्रवासी, मुली, वृद्ध महिला उभ्या असतात, त्यामुळे त्यांना सतत अशा असभ्य व लाजिरवाण्या दृश्यांना सामोरे जावे लागत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या वॉशरूमलाही दरवाजा नसल्याचे आढळून आले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि गोपनीयतेचा प्रश्न असताना रेल्वे प्रशासनाची ही बेपर्वाई गंभीर आहे. स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया यासारख्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असतील, तर किमान मूलभूत सुविधा तरी प्रत्यक्षात दिसायला हव्यात, अशी तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
दररोज हजारो प्रवासी, महिला, विद्यार्थी, वृद्ध नागरिक जळगाव रेल्वे स्टेशनचा वापर करतात. अशा ठिकाणी शौचालयांना दरवाजे नसणे म्हणजे महिलांच्या सन्मानाशी थेट खेळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शौचालयांना योग्य दरवाजे बसवावेत, स्वच्छतेची व्यवस्था सुधारावी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी प्रवाशांनी केली आहे.
फक्त घोषणा करून नव्हे, तर प्रत्यक्ष काम करूनच ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत’ साकार होईल. आता तरी रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का, असा प्रश्न प्रवासी नागरिक उपस्थित करत आहेत.