उपमहापौरांच्या पाहणीनंतर प्रशासनाची तात्काळ कारवाई; एम. जे. महाविद्यालयाजवळ धोकादायक नाल्याच्या आजूबाजूला लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले.
जळगाव : एम. जे. महाविद्यालय परिसरातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असलेल्या उघड्या नाल्याबाबत उपमहापौर मनोज चौधरी यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणीनंतर त्यांनी मनपा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या सूचनांची दखल घेत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत नाल्यावरील धोकादायक भागांवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
एम. जे. महाविद्यालय परिसरात शाळा, महाविद्यालये, जिम आणि विविध प्रशिक्षण केंद्रे असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे उघड्या नाल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. याची गंभीर दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी यांनी शहर अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने प्रशासनाने लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याचे काम हाती घेतले असून, नाल्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी या तात्काळ कारवाईचे स्वागत केले असून, पावसाळ्यापूर्वी धोकादायक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभारल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.