ताज्या बातम्या

शहरातील कचरा संकलनाचा डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना


जळगाव : शहरातील डम्पिंग ग्राउंड येथे सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाची आज उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसह पाहणी करून आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, आरोग्य उपायुक्त निर्मला गायकवाड, मनपा आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, प्रकल्प प्रमुख अभियंता योगेश वाणी, तसेच ‘रॉयल वेस्टर्न’चे राऊत आणि ‘श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर’चे साईट इंजिनीयर उपस्थित होते.

गेल्या वेळी दि. ३० ऑक्टोबर रोजी उपमहापौर मनोज चौधरी तसेच सभापती ड्रा चंद्रशेखर पाटील याच्या सोबत आयुक्त आदित्य जीवणे व महापौर दीपमाला काळे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, नगरसेविका जयश्री पाटील यांनीही या कामाची पाहणी केली होती. त्या तुलनेत आता कामात चांगली सुधारणा आणि गती दिसून येत आहे. सद्यस्थितीत रॅम्पचे काम सुमारे ८० टक्के, तर प्रोसेसिंग प्लांटचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. रॅम्पचे उर्वरित काम येत्या महिनाभरात पूर्ण होईल, तसेच प्रोसेसिंग प्लांटचे फॅब्रिकेशन तयार असून काँक्रिटींग बेस व पिलरचे काम होताच पुढील ३ ते ४ महिन्यांत फॅब्रिकेशनचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती ठेकेदाराकडून देण्यात आली. हे सर्व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र मनपा प्रशासनाला देण्याच्या सूचना उपमहापौर मनोज चौधरी व सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी ‘रॉयल वेस्टर्न’च्या प्रतिनिधींना दिल्या.

पदाधिकाऱ्यांचा कडक इशारा:

यावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकारी आणि ठेकेदाराला कडक शब्दांत सुनावले की, “जळगाव शहराचा संपूर्ण कचरा आमच्या प्रभागात आणला जातो. जर हे काम दिलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही, तर आम्ही डम्पिंग ग्राउंडवर कचरा येऊ देणार नाही.”

डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे धुराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या धुरामुळे नागरिकांना दिवाळीसारखा सणही नीट साजरा करता आला नाही आणि घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. परिसरात दमा, त्वचाविकार (स्किन) आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावर तातडीने उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राउंडवर २४ तास अग्निशमन दलाचा बंब तैनात ठेवण्यात यावा, जेणेकरून आग लागणार नाही आणि धूर होणार नाही, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांना देण्यात आल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button