Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश महापौर दीपमाला काळे यांचा प्रभाग १८ मधील पाहणी दौरा


​जळगाव : महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) प्रभाग क्रमांक १८ मध्ये पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध भागांना भेटी देऊन स्वच्छता, पथदिवे आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांचा आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला.

*​स्वच्छता व मनुष्यबळ*
प्रभागात साफसफाईसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निदर्शनास आले, ज्यासाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रभागात स्वच्छता नियमित होत असून गटारीही वेळोवेळी काढल्या जात असल्याची माहिती यावेळी नगरसेवकांनी दिली. महापौरांनी भापसे चौक आणि म्हाडा कॉलनी परिसरात पाहणी करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.

*​पाणी अपव्ययाबद्दल नागरिकांना खडे बोल*
म्हाडा कॉलनी परिसराची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर संताप व्यक्त करत त्यांनी नागरिकांना धारेवर धरले. “जळगावात पाणीसाठा कमी असून जून महिन्यापर्यंत दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते; अशा वेळी पाणी जपून वापरले पाहिजे, वाया का घालवता?” अशा कडक शब्दांत त्यांनी नागरिकांना सुनावले. तसेच, विनाकारण पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.

*​पथदिव्यांच्या समस्येवर तातडीचे निर्देश*
भापसे अण्णा चौक परिसरासह वॉर्डांत पथदिव्यांची मोठी समस्या असून, दिवे अत्यंत कमी आणि मंद प्रकाश देत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या गंभीर तक्रारीची दखल घेत महापौरांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच पाणीपुरवठा विभागाला सार्वजनिक नळांना तोट्या बसवण्याबाबत आणि गजानन महाराज मंदिर चौकातील पाणीपुरवठा कार्यालयास भेट देऊन कामकाज पाहण्याचे आदेश दिले.
​
​या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेविका अनिता भापसे, नलुबाई सोनवणे, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे यांच्यासह पाणीपुरवठा, विद्युत व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button