Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी मेहरून तलावावर मनपाचा अग्निशमन दल वन्यजीव संरक्षण संस्था संयुक्त सज्ज! शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम यशस्वी


जळगाव, दि. ९ सप्टेंबर २०२६ : गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन दल आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मेहरून तलाव येथील गणेश घाटावर शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम (मॉकड्रिल) घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त मा. आदित्य जिवने (भा.प्र.से ) यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावाद्वारे विसर्जनावेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाची तयारी तपासण्यात आली.

विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांचा उत्साह सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मेहरून तलावावर ही मॉकड्रिल घेण्यात आली.

रबर बोटीद्वारे जलद बचावकार्याचे प्रात्यक्षिक

या रंगीत तालीमेत पाण्यात एखादी व्यक्ती संकटात सापडल्यास तिला कमीत कमी वेळेत सुरक्षित बाहेर काढण्याची कार्यपद्धती प्रत्यक्ष दाखविण्यात आली. OBM रबर बोटीच्या साहाय्याने जवानांनी तलावात जलद हालचाल करून बचावकार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. बोटीचे नियंत्रण, पाण्यातील आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती दक्षता आणि जीवरक्षक उपकरणांचा वापर याबाबतही सराव करण्यात आला.

पाण्यातील बचावकार्य करताना जवानांनी दाखविलेली तत्परता, समन्वय आणि तांत्रिक कौशल्य यामुळे उपस्थितांना अग्निशमन दलाच्या तयारीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. विसर्जनाच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य दुर्घटनांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी अशा सरावाचे महत्त्व अधोरेखित झाले.

प्रशिक्षित जवानांचे पथक सज्ज ,मुख्य अग्निशमन अधिकारी मा. अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सराव पार पडला. केंद्र अधिकारी भारत बारी यांच्यासह अनुभवी वाहनचालक आणि फायरमन यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जलद प्रतिसाद, बचावकार्याची अंमलबजावणी आणि आपत्कालीन साधनसामग्रीचा वापर याबाबत जवानांनी कौशल्याचे प्रदर्शन केले.

अग्निशमन दलाच्या पथकात देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, निवांत इंगळे, अजय पाटील, प्रदीप धनगर, तेजस जोशी, गिरीश खडके, ऋषभ सुरवाडे, केतन पाटील, विकी सोनवणे, नितीन ससाने व रजनीश भावसार यांचा समावेश होता.

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकात सचिव योगेश गालफडे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, अजीम काझी सर, प्रदीप शेळके, रामलाल बोरसे, दिनेश सपकाळे, गोकुळ पाटील व राजू गुप्ता यांनी सहभाग घेतला. भाविकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे

गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मेहरून तलाव परिसरात प्रशिक्षित जवानांचे पथक आणि आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी विसर्जनावेळी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. “बाप्पाला निरोप देताना भाविकांची सुरक्षा हीच आमची पहिली प्राथमिकता आहे,” असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. गणेशभक्तांनी निर्धास्तपणे, मात्र आवश्यक ती काळजी घेत विसर्जन सोहळ्यात सहभागी व्हावे, असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button