ताज्या बातम्या

जळगाव मनपात ‘NAMASTE Day’ साजरा; स्वच्छता कर्मचाऱ्यांना PPE किटचे वाटप, आरोग्य तपासणी


प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेत मंगळवारी (दि. 14) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत ‘NAMASTE Day’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांचे आरोग्य, सन्मान आणि कल्याण या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपायुक्त निर्मला गायकवाड आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आयुक्त आदित्य जीवने यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले. नाले, गटारे, सांडपाणी वाहिन्या आदी धोकादायक ठिकाणी काम करताना PPE (Personal Protective Equipment) चा नियमित वापर करावा, कोणतीही जोखीम न पत्करता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना PPE किटचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित वैद्यकीय पथकाकडून कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील NAMASTE Day उपक्रमाचे थेट वेबकास्टही उपस्थितांना दाखविण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सुरक्षित, निरोगी आणि सन्मानजनक कार्यपरिसरासाठी जळगाव महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सहाय्यक अभियंता समीर बोरोले, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, सर्व आरोग्य निरीक्षक तसेच मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button