Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

खानदेशातील शेतकरी कुटुंबातील रोहित निकम यांची पणन महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

७० वर्षांनंतर पणन महासंघावर भाजपचे नेतृत्व;


प्रतिनिधी मुंबई : खानदेशातील शेतकरी कुटुंबातून आलेले युवा सहकार नेते रोहित दिलीपराव निकम यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (पणन महासंघ)च्या अध्यक्षपदी, तर राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे, तब्बल ७० वर्षांनंतर प्रथमच या शिखर सहकारी संस्थेचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेतृत्वाकडे आले आहे.

मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात गुरुवारी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत ही निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर रोहित निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री संजय सावकारे यांचे आभार मानले. शेतकरी हित, सहकार क्षेत्राची मजबुती आणि पारदर्शक प्रशासनासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील कृषी उत्पादनांचे विपणन, साठवणूक आणि शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या पणन महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शेतकरी कुटुंबातील आणि सहकार क्षेत्राचा अनुभव असलेले रोहित निकम सध्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक, जळगाव जिल्हा कृषी उद्योग व सर्व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच भाजप सहकार आघाडीचे राज्य सहसंयोजक आहेत.

या निवडीमुळे सहकार क्षेत्राला नवे नेतृत्व मिळाले असून, शेतकरी हिताच्या योजनांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button