जळगाव पोलीसांची विद्यार्थी सुरक्षा मोहीम; शाळा बस व रिक्षाचालकांच्या अचानक मद्यपान चाचण्या मोहीम सुरू!
जळगाव प्रतिनिधी :शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जळगाव पोलीस दलाने एक अभिनव आणि समाजाभिमुख विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा बस चालक तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे अचानक मद्यपान चाचणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त राहावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.पोलीसांकडून शहरातील विविध शाळांबाहेर तसेच प्रमुख चौकांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली जात असून, वाहनचालक मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवत नाहीत ना, याची खातरजमा केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

ही मोहीम केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्याचा विचार करून राबविण्यात आलेली संवेदनशील आणि दूरदृष्टीची कृती मानली जात आहे. यामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत अधिक विश्वास वाटत असून, वाहनचालकांमध्येही जबाबदारीची भावना निर्माण होत आहे.
जळगाव पोलिसांचे हे पाऊल प्रतिबंधात्मक पोलीसिंगचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शाळा प्रशासन आणि नागरिकांकडून स्वागत होत असून, ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.