जळगाव तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई; जबरी चोरीचा गुन्हा काही तासांत उघड, चार आरोपी जेरबंद
प्रतिनिधी जळगाव, दि. 11 जून – जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावत चार आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासामुळे गुन्ह्याचा उलगडा झाल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक 178/2026 अन्वये जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 11 जून 2026 रोजी साई गार्डन हॉटेल परिसरात फिर्यादी व साक्षीदार यांना धमकावून तसेच मारहाण करून त्यांच्याकडील 7 हजार 800 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळाची पाहणी, स्थानिक माहिती, तांत्रिक तपास तसेच संशयितांची पडताळणी करून पोलिसांनी अल्पावधीतच गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटविली.तपासादरम्यान पोलिसांनी खालील चार आरोपींना ताब्यात घेतले आहे :
चेतन उर्फ बट्या रमेश सुरेश (वय 21 वर्षे)
गोरख संजय जाधव (वय 21 वर्षे)
रोशन भगवान पाटील (वय 26 वर्षे)
अभिजीत दत्तात्रय आवटे (वय 24 वर्षे)
पोलिसांनी केलेल्या जलद आणि नियोजनबद्ध तपासामुळे गुन्ह्याचा उलगडा होऊन आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात यश आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून जळगाव तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.