ताज्या बातम्या

शहरातील रिंग रोडचे काम रखडले, ; महापौरांच्या पाहणीत पीडब्ल्यूडीचा गोंधळ समोर

दोन तास वाट पाहूनही अधिकारी फिरकले नाहीत; रिंग रोड पाहणीत महापौर काळे संतप्त!


जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील रिंग रोडवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीसह छोटे-मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत गुरुवारी महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्यक्ष रिंग रोड परिसराची पाहणी केली. मात्र या पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD) सावळा गोंधळ आणि अधिकाऱ्यांची बेजबाबदार कार्यपद्धती उघड झाली.

रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत महापौर काळे यांनी संबंधित पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाहतुकीची समस्या आणि अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता, किमान रिंग रोडच्या एका बाजूचा रस्ता तरी तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महापौरांनी केली. मात्र यावरही अधिकाऱ्यांनी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे कारण पुढे करत स्पष्ट उत्तर देणे टाळल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, महापौरांनी तब्बल दोन ते अडीच तास परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची वाट पाहिली. मात्र एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. केवळ मक्तेदारांनी उपस्थित राहून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

शहरातील महत्त्वाच्या रिंग रोडचे काम रखडल्याने नागरिकांचा संयम सुटत असून, अतिक्रमण हटविणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण वेगाने पूर्ण करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

रिंग रोडवरील रखडलेली कामे, वाढते अतिक्रमण आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button