बुद्ध पौर्णिमेनिमित्त जळगावात भव्य रॅली व सेवा उपक्रम संपन्न
भव्य रॅली, पाणीसेवा आणि खीरदानातून बुद्ध पौर्णिमेचा संदेश अधोरेखित
जळगाव : बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले. १ मे २०२६ रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन परिसर) येथून चोखामेळा वस्तीगृहापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत धम्म उपासक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाढत्या उष्णतेचा विचार करून ‘भीम जयंती पोलीस लाईन, जळगाव’ या समूहाच्या वतीने रॅलीतील सहभागींसाठी पिण्याचे पाणी व थंड पेयांचे वाटप करण्यात आले. गांधी उद्यान, बसस्थानकाजवळ सकाळी ८ वाजता हा उपक्रम पार पडला असून, उपस्थितांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सायंकाळी नवीन पोलीस वसाहत परिसरात १०० लिटर दुधापासून खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमालाही नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या सर्व उपक्रमांमधून बुद्ध पौर्णिमेचा करुणा, सेवा आणि बंधुभावाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. तसेच, भीम जयंती पोलीस परिवाराने रॅलीत सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.