५ वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी जळगावात; मनोज जोशी यांना चित्रतपस्वी पुरस्कार, आरोह वेलणकर व सुरभी हांडे यांना चित्रगौरव सन्मान
५ वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी रंगणार..पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव प्रतिनिधी : अजिंठा फिल्म सोसायटी आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी एम. जे. कॉलेज परिसरातील कान्ह ललित कला केंद्र येथे मोठ्या उत्साहात रंगणार आहे. चित्रपटप्रेमी, युवा फिल्म मेकर्स आणि रसिक प्रेक्षकांसाठी हा महोत्सव एक मोठी पर्वणी ठरणार असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
या दोन दिवसीय महोत्सवात चित्रपट प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, ‘दुरिंग टॉकीज’, तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य उद्घाटन व समारोप सोहळा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
देश-विदेशातील ८० निवडक चित्रपटांचे प्रदर्शन
यंदा महोत्सवाचे पाचवे वर्ष असून देशातील २० राज्यांसह विदेशातून मोठ्या संख्येने शॉर्ट फिल्म, माहितीपट, कॅम्पस फिल्म आणि बालचित्रपट प्राप्त झाले आहेत. तज्ज्ञ परीक्षकांच्या निवडीनंतर ८० उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन तीन सभागृहांमध्ये करण्यात येणार आहे. सुमारे ३०० युवा चित्रपटनिर्माते यानिमित्ताने जळगावात सहभागी होणार असून प्रेक्षकांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी विषयांवरील उत्कृष्ट चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाच्या संपूर्ण परिसराला ‘दादासाहेब फाळके चित्र नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच स्क्रिनिंग सभागृहांना धर्मेंद्र देओल, व्ही. शांताराम आणि प्रिया मराठे यांची नावे देण्यात आली आहेत.
उद्घाटन सोहळा व विशेष कार्यक्रम
दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. दुपारी चित्रपट आणि समाज जागरण या विषयावर चित्रपट अभ्यासक अभिजित गोखले यांचा मास्टर क्लास होईल. त्यानंतर ‘रंगभूमी ते चित्रपट सृष्टी – एक प्रवास’ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसेच चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा होईल. यावेळी स्व. राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच मनोज जोशी यांना यंदाचा ‘देवगिरी चित्रतपस्वी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता ‘दुरिंग टॉकीज’ अंतर्गत दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन होणार असून दिग्दर्शक प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
मास्टर क्लास, प्रकट मुलाखती व युवा संवाद
दि. १ मार्च रोजी सकाळपासून विविध चित्रपटांचे प्रदर्शन सुरू राहील. ‘दिग्दर्शकाच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या विषयावर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची प्रकट मुलाखत होईल. तसेच अभिनेते योगेश सोमण आणि दिग्दर्शक अतुल गंगवार हे ‘चित्रपट निर्मिती प्रक्रिया – आव्हाने आणि संधी’ या विषयावर युवा चित्रपटनिर्मात्यांना मार्गदर्शन करतील.
ओपन फोरम सत्रात अभिनेता आरोह वेलणकर आणि अभिनेत्री सुरभी हांडे युवा चित्रकर्मींसोबत संवाद साधणार आहेत.
समारोप सोहळ्यात चित्रगौरव पुरस्कार प्रदान
समारोप सोहळा १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अभिनेता आरोह वेलणकर आणि अभिनेत्री सुरभी हांडे यांना ‘देवगिरी चित्रगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, माहितीपट आणि कॅम्पस फिल्म यांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत.
नागरिकांसाठी मोफत प्रवेश; लाभ घेण्याचे आवाहन
या महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य विभाग, फिल्म सिटी, जैन उद्योग समूह आणि श्री रामलाल चौबे ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण महोत्सव सर्व नागरिक, चित्रपटप्रेमी आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पूर्णपणे मोफत खुला आहे.
महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवलेकर, प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे, शशिकांत बडोदकर, अनिल भोळे, विनीत जोशी, डॉ. संजय हांडे, डॉ. सुचित्रा लोंढे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, पंकज सोनवणे, अॅड. प्रसाद गोडबोले आणि किरण सोहळे यांनी केले आहे.
हा महोत्सव जळगावच्या सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून युवा कलावंतांना प्रेरणा आणि संधी देणारा मंच ठरणार आहे.