ताज्या बातम्या

लोकशाही धोक्यात? मतदार याद्यांतील घोळ रोखण्यात निवडणूक आयोग अपयशी!

5000 तक्रारी तरीही ठोस कारवाई नाही—निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह..मतदार याद्यांतील गंभीर त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र आक्षेप घेत आयुक्तांना निवेदन


जळगाव – जळगाव शहर महापालिका निवडणूक 2026 च्या तयारीत मनपा प्रशासन जोमाने कार्यरत असताना मतदार याद्यांतील गंभीर त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र आक्षेप घेत आयुक्तांना निवेदन सादर केले. मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवू नये, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक तयारीच्या सर्व टप्प्यांत मनपा प्रशासनाचा गलथान व ढिसाळ कारभार उघड झाला आहे, अशी टीका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. प्रभाग रचना, आरक्षण सोडत व आता मतदार याद्यांतील गोंधळ – प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाने राजकीय दबावाला शरण गेल्याचा आरोपही करण्यात आला.

20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्राथमिक मतदार याद्यांवर तब्बल 5,000 ते 6,000 तक्रारी नोंदल्या गेल्या असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

प्रत्येक प्रभागात 2,000 ते 3,000 नावे दुबार, अनेक मतदारांची नावे दोन-तीन प्रभागांत, 15–20 वर्षांपूर्वी स्थलांतरित व मृत मतदारांची नावे अजूनही सूचीमध्ये, तसेच इतर विधानसभा मतदारसंघातील नावे मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले.

यामुळे निवडणुकीवर परिणाम होऊन सत्ताधाऱ्यांना फायदा मिळावा, हा उद्देश स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप पक्षाने केला.प्रभाग रचनेवर नागरिक व इच्छुक उमेदवारांनी नोंदवलेल्या हरकतींवर कोणतीही कारवाई न करणे, ओबीसी आरक्षणावर अपयश आल्याने निवडणूक आयोगाचा फटकारा अशा घटनांनी मनपा प्रशासनाची निष्क्रियता सिद्ध झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मतदार याद्यांतील दुबार नावे, मृतांचे नावे, इतर विधानसभा मतदारसंघातील नावे तत्काळ काढावीत मतदार हरकतींसाठी आठ दिवसांचा कालावधी वाढवावा याशिवाय मतदार याद्या दुरुस्त न करता कोणतीही निवडणूक प्रक्रिया सुरू करू नये

वरील मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

या निवेदनावेळी महानगर अध्यक्ष इजाज मलिक, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष रिकु चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, मजहर पठाण, डॉ. रिजवान खाटीक, गौरव वाणी, कलाबाई शिरसाट, रहीम तडवी, आकाश हिवाळे, गणेश पाटील, गौरव डांगे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button