मनपाची गोल्ड जिमला नोटीस :पार्किंगच्या जागेत थाटला व्यवसाय ! वाहने पार्क होतात थेट रस्त्यावर.
नोटीस देऊन 15 दिवस उलटले, पण कारवाई शून्य — अनधिकृत व्यावसायिकांना मनपाचे संरक्षण?
जळगाव प्रतिनिधी: एम. जे. कॉलेज परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अनेक वर्षांपासून बेसमेंट पार्किंग जागेचा दुरुपयोग करून व्यावसायिक वापर सुरु असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अपार्टमेंट मध्ये फिटनेस सेंटर, जिम तसेच आय हॉस्पिटल आहे. दवाखान्यात व जिममध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची जागा न मिळाल्याने वाहनांचे थेट रस्त्यावर पार्किंग केले जाते, त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी व छोटे-मोठे अपघात सातत्याने होत असतात.
दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला अपघातात आपला पाय गमवावा लागला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या गंभीर घटनेलाही अपार्टमेंट धारकाने गांभीर्याने न घेतल्याचा आरोप व्यक्त करण्यात येत आहे. “आम्ही पैसा कमावू, तुम्ही जीव गमवा!” अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे, अशी बोचरी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या अनधिकृत व्यवसायाबाबत महानगरपालिकेकडे तीन ते चार तक्रारी आल्या असून, त्यानुसार मनपाच्या नगररचना विभागाने अपार्टमेंट धारकाला नियमबाह्य बांधकाम व बेसमेंटचा अयोग्य वापर याबाबत नोटीस बजावली आहे. संबंधितांनी 15 दिवसांत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपाने दिला आहे.
नोटीस मध्ये काय नमूद केले ते बघूया.
अनधिकृत बांधकामावर मनपाची कारवाईची नोटीस..
गोल्ड जिम प्रोप्रायटर श्री सोनी यांना नोटीस देण्यात येत आहे,
जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील मेहरुण शिवार परिसरात परवानगीशिवाय करण्यात आलेल्या बांधकामाबाबत गोल्ड जिमचे प्रोप्रायटर श्री सोनी (रामदास कॉलनी, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव) यांना नोटीस बजावत आहे. नगररचना विभागाच्या निरीक्षणात सदर भूखंड क्र. 15, स.नं./ग.नं./सि.स.नं. 490/4 येथील इमारतीमध्ये बेसमेंटसह अनधिकृतरीत्या सुपर शॉप, हॉटेल व आईस्क्रीम पार्लर सुरू असल्याचे आढळून आले आहे.
विना परवाना व नियमबाह्य वाढीव बांधकाम केल्यामुळे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कारवाई का करण्यात येऊ नये. याबाबतचा लेखी खुलासा व इमारत परवानगीचे सर्व कागदपत्रे 15 दिवसांच्या आत नगररचना विभागाकडे सादर करावीत, असे आदेश देण्यात येत आहे.
निर्धारित कालावधीत समाधानकारक खुलासा न मिळाल्यास, सदर अनधिकृत बांधकाम/वाढीव बांधकाम मनपाकडून संबंधितांच्या खर्चाने पाडण्यात येईल, तसेच यामुळे होणाऱ्या सर्व नुकसानाची जबाबदारी संबंधित प्रोप्रायटरवर राहील,असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे.
सदर नोटीस देऊन 15 दिवस उलटले, पण अपार्टमेंट धारकाचा खुलासा आलेला नाही, यावर आता मनपा अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.