टॉवर चौकातील लॉजवर मध्यरात्री छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पैशाच आमिष दाखवत महिलांचा वापर; पोलिसांच्या कारवाईत रॅकेट उद्ध्वस्त
प्रतिनिधी जळगाव : शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.९) मध्यरात्री धाडसी कारवाई करत पर्दाफाश केला. अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून काही महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या देहविक्री करवून घेतली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एलसीबी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त कारवाईची योजना आखली.
या सापळ्यात पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून लॉजमधील व्यक्तीशी पैशांची बोलणी केली. व्यवहार निश्चित होताच संबंधित ग्राहकाने पोलिसांना इशारा दिला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पथकाने लॉजवर छापा टाकत सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला.या कारवाईदरम्यान पोलिसांनी राजू मोतीराम जोशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा कायदा) कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटची व्याप्ती इतर भागांपर्यंत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात अडकलेल्या महिलांची सुटका करून त्यांचे समुपदेशन सुरू करण्यात आले असून त्यांना सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच एलसीबी व एएचटीयू पथकाने केली.