जळगाव पोलिसांची मध्यरात्री धडक मोहीम; ट्रॅव्हल बसेसवर अचानक चेकिंग.
जळगाव | प्रतिनिधी : जिल्ह्यातून रात्री व पहाटे धावणाऱ्या ट्रॅव्हल बसेसमधून गुटखा, हवाला रक्कम, गांजा, देसी कट्टा तसेच चोरीच्या मालाची वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. यासाठी आज मध्यरात्री व पहाटे अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या विशेष कारवाई अंतर्गत पोलिसांच्या पथकांनी मुक्ताईनगर-बोदवड चौफुली, आकाशवाणी चौफुली आणि भुसावळ परिसरात नाकाबंदी करून ट्रॅव्हल बसेसची सखोल तपासणी केली. काही ठिकाणी खाजगी बसचे कंडक्टर हे कुरिअरप्रमाणे संशयास्पद वस्तूंची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आल्याने ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान बसेसमधील प्रवाशांची तपासणी, संशयास्पद बॅग्सची तपासणी तसेच बसच्या डिक्क्यांची पाहणी करण्यात आली. तसेच आरसीपी (रोड चेक पोस्ट) चा वापर करून वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात आली.
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी पुढील काळातही अशा अचानक तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.