मनपाच्या प्रभाग क्रमांक ४ कार्यालयातील उपस्थितीची पाहणी; १९ पैकी १७ कर्मचारी हजर, दोन कर्मचारी गैरहजर…
प्रभाग कार्यालयात हजेरीचा बोजवारा? ९.४५ ची वेळ, दोघे १०.४५ पर्यंत दिसलेच नाही.
जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या गिरणा टाकी परिसरातील प्रभाग क्रमांक ४ कार्यालयाची ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०:४५ वाजता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कार्यालयातील एकूण १९ कर्मचाऱ्यांपैकी १७ कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे पाहणीत आढळून आले, तर दोन कर्मचारी १०:४५ पर्यंत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
प्रभाग क्रमांक ४ कार्यालयात एक कर अधीक्षक, पाच लिपिक, १२ शिपाई आणि एक वॉचमन असे एकूण १९ कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आहे. सकाळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कर्मचारी एकामागून एक कार्यालयात दाखल होत असल्याचे पाहणीत दिसून आले. सकाळी १० वाजेपर्यंत एका मागे एक असे १७ कर्मचारी कार्यालयात उपस्थित झाले.
या दरम्यान, कर अधीक्षक अनुभा भट यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, आपण मनपा इमारतीमध्ये चलन घेण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १९ पैकी तीन कर्मचारी हे बीएलओच्या (BLO) कामासाठी कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दोन कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले. या कार्यालयातील पाहणीसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज प्रभागामध्ये उपलब्ध आहेच, त्यासोबत पत्रकाराने केलेले चित्रीकरण हा सुद्धा मोठा पुरावा आहे, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत प्रशासनाने नोंदवही, बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वस्तुनिष्ठ पडताळणी करणे अपेक्षित आहे. मागील महिन्यात आरोग्य विभागाचे ३ कर्मचारी ७ महिने,२ वर्ष आणि ३ वर्षापासून सातत्याने कामालाच येत नसल्याचे आढळून आले आहे. त्या अनुषंगाने प्रभाग समिती चार मध्ये असं काही प्रकरण घडत असल्याचा संशय असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली होती.
महापालिका कार्यालयात नागरिकांची विविध कामे होत असल्याने कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणे आणि कार्यालयीन कामकाज सुरळीत ठेवणे अपेक्षित आहे. त्यामुळे सकाळी ९.४५ ची कार्यालयीन वेळ असताना दोन कर्मचारी १०.४५ वाजेपर्यंत कार्यालयात का पोहोचले नाहीत, याबाबत प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.