पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात; ममुराबादमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई व प्रज्ञावंत फाउंडेशनचा संयुक्त सामाजिक उपक्रम; आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप
जळगाव प्रतिनिधी: जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी वस्तीमध्ये पाणी शिरून अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. या पूरपरिस्थितीनंतर तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच विविध आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास ममुराबादचे सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया विभागाचे जळगाव महानगर अध्यक्ष विक्रम कापडणे, सतीश सैंदाणे, भूषण बोरसे, अशोक मोरे, प्रकाश माळी, मच्छिंद्र सोनवणे, सुकलाल माळी तसेच ग्रामस्थ आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रविण सपकाळे यांनी आपत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले. गरजू व पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.