अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीवर ४२ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा; जळगावात FIR दाखल
जळगाव (दि. १ मे २०२६) — अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., मुंबई विरोधात तब्बल ₹42,60,76,562/- रुपयांच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, CCTNS गुन्हा क्रमांक 127/2026 अंतर्गत भा.द.वि. कलम 406, 409 आणि 420 नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दिनांक 01 मे 2026 रोजी रात्री 9.10 वाजता दाखल करण्यात आला.
या प्रकरणात फिर्यादी म्हणून योगेश प्रकाश बोरोले (वय 46), प्रभारी शहर अभियंता, जळगाव महानगरपालिका यांनी तक्रार दिली आहे. तर आरोपी म्हणून अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., मुंबई, त्यांचे संचालक राझू अंबालाल वावरोट (अंधेरी, मुंबई) तसेच कंपनीचे इतर संचालक व संबंधित व्यक्तींचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, दिनांक 20 मार्च 1997 ते 01 एप्रिल 2006 या कालावधीत तत्कालीन जळगाव नगरपरिषद हद्दीत विविध रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी कंपनीने निविदा घेतली होती. कंपनीने नगरपरिषदचा विश्वास संपादन करून करार केला; मात्र ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न करता संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप आहे.यामध्ये मोबिलायझेशन फंड, त्यावरील व्याज, दंड तसेच नगरपरिषदेकडून करण्यात आलेला खर्च यांचा समावेश असून एकूण ₹42,60,76,562/- इतकी रक्कम अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी आता EOW जळगावकडे वर्ग करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर संबंधितांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.