२४२ धावांचा डोंगर सर; अमळनेर सुहांस जायंट्स फायनलमध्ये धडक
ओम भोसलेची १७० धावांची खेळी व्यर्थ; दुसरा फायनलिस्ट आज ठरणार
जळगाव, दि. २४ (प्रतिनिधी) — जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६ (JCL T-20) स्पर्धेत अमळनेर सुहांस जायंट्सने पहिल्या क्वालिफायरमध्ये जबरदस्त कामगिरी करत जळगाव कोगटा किंग्सने उभारलेला २४२ धावांचा प्रचंड डोंगर पार करत थाटात फायनलमध्ये प्रवेश केला. आता दुसरा फायनलिस्ट एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायरमधून निश्चित होणार असून सामना दि. २५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना जळगाव कोगटा किंग्सने धडाकेबाज सुरुवात केली. ओम भोसलेने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत ७४ चेंडूत १० षटकार व १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १७० धावांचा तुफानी डाव साकारला. त्याला अक्षय मेघानी (२१), जितेंद्र नाईक (२०) यांची साथ मिळाली. निर्धारित २० षटकांत ३ बाद २४२ धावा असा भक्कम स्कोर उभारण्यात आला.
परंतु या आव्हानाला अमळनेर सुहांस जायंट्सने तितक्याच जोरदार प्रत्युत्तर दिले. केवळ १८.३ षटकांत ३ गडी गमावत २४६ धावा करत त्यांनी सामना जिंकला. मानव ट्रिबरेवालने ६४ धावा, रणजीत निकमने २८ चेंडूत ७६ धावा तर कर्णधार शुभम शर्माने ३० चेंडूत ६५ धावा करत विजयाची नांदी लिहिली. रणजीत निकम याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दरम्यान, लीग फेरीतील अखेरच्या सामन्यातही अमळनेर सुहांस जायंट्सने दमदार कामगिरी करत पाचोरा एसकेटी योद्धाजचा ६७ धावांनी पराभव केला. शुभम शर्मा (६९) आणि अजय पाटील (६९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १९६ धावांचे लक्ष्य उभे राहिले. प्रत्युत्तरात पाचोरा संघ १२९ धावांत गारद झाला. सतीश चतुर्वेदीने ४ बळी घेत निर्णायक कामगिरी बजावली.
या विजयामुळे अमळनेर सुहांस जायंट्सचा आत्मविश्वास उंचावला असून ते आता विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे सरसावले आहेत.