Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

पोलीस कॉलनीतील सांडपाणी प्रश्नावर मनसे आक्रमक; गटारीच्या तातडीच्या बांधकामासाठी आयुक्तांना निवेदन


जळगाव प्रतिनिधी  : प्रभाग क्रमांक १८ मधील पोलीस कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी निचऱ्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे. यासंदर्भात जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पोलीस कॉलनी परिसरात मागील सुमारे पंधरा वर्षांपासून सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

नागरिक नियमितपणे महानगरपालिकेचे कर भरत असतानाही मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. तसेच स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन ही स्थानिक स्वराज्य संस्थेची वैधानिक जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे संबंधित परिसराची तात्काळ पाहणी करून गटारीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देऊन नियोजित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच कामाच्या प्रगतीची माहिती नागरिकांना लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, चेतन पवार, विभाग अध्यक्ष खुशाल ठाकूर, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, महाराष्ट्र सैनिक शरीफ पिंजारी, जहांगीर पेंटर, अफजल इसाक खाटीक यांच्यासह सुप्रीम कॉलनी व पोलीस कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस कॉलनी परिसरातील सांडपाणी प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button