मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे पहिल्या टप्यासाठी १३ सप्टेंबर, पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे पहिल्या टप्यासाठी १३ सप्टेंबर, पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव दि. 9 ( जिमाका ) – महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. वय वर्षे ६० किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना या योजनेतील पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयासाठी एक हजार लाभार्थ्यांचे उदिष्ट देण्यात आलेले आहे. पहिल्या टप्पासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आलेले आहे. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत किवा सहायक आयुक्त, समाज, कल्याण, कार्यालय पत्ता- डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव येथे सादर करावेत. सदर योजने अंतर्गत पहिल्या टप्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत ही १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. योजनेसाठीचे अर्ज गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध आहेत. उदिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. १३ सप्टेंबर, २०२४ पर्यंत ६० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरीकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.