गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला; ६०-७० गावांचा पाणी प्रश्न गंभीर.
प्रतिनिधी जळगाव : गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांच्या प्रकल्पाला शासनाची मान्यता मिळूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने जिल्ह्यातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता रमेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली आहे.
गिरणा धरणाखालील सुमारे १६८ किलोमीटर परिसरातील ६० ते ७० गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आवर्तनावर अवलंबून राहावे लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून गिरणा नदीवर विविध ठिकाणी साखळी बंधाऱ्यांची मागणी लोकप्रतिनिधींनी सातत्याने केली होती. त्यानुसार राज्यपालांच्या पत्रानुसार या प्रकल्पाला नवीन प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली होती.
दिनांक २८ डिसेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार या सात बंधाऱ्यांसाठी सुमारे ७११.१५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याच्या अधीन राहून हा प्रकल्प राबविण्याचे ठरले होते. तसेच संबंधित ठिकाणी पाणी उपलब्धतेबाबत आवश्यक सर्वेक्षण पूर्ण होऊन प्रमाणपत्रेही प्राप्त झाली आहेत. केंद्रीय जल आयोगाची मान्यताही प्रकल्पाला मिळाली आहे.
मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. हा प्रकल्प तातडीने सुरू न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.