निंभोरा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी – १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, १० गुन्ह्यांचा पर्दाफाश
निंभोरा प्रतिनिधी : निंभोरा पोलीस स्टेशनने शेती साहित्य, तोलकाट्यावरील साहित्य तसेच मोटारसायकल व कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गेल्या काही दिवसांत निंभोरा, सावदा, यावल, रावेर व मुक्ताईनगर परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत होत्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि हरिदास बोचरे यांनी पथके तयार करून नाकाबंदी, रात्रगस्त व तांत्रिक तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ११ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी विलास ऊर्फ काल्या वाघोदे याचा शोध घेण्यात आला. तो फरार झाला मात्र त्याच्या सहकाऱ्यांकडून चौकशी व छाप्यात चोरीस गेलेले साहित्य व मुद्देमाल मिळून आला.
या कारवाईत मुख्य सुत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी (रा. निंभोरा बुडा) याच्यासह एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून HTP पंप मशिन, बॅटऱ्या, इन्व्हर्टर, सौर साहित्य, मोटारसायकली, पावर ट्रॉली, नॅनो कार यासह मोठ्या प्रमाणावर शेती व इलेक्ट्रिक साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कारवाईतून निंभोरा पोलीस स्टेशनचे ५ गुन्हे, यावलचे २, रावेरचा १, मुक्ताईनगरचा १ व सावदा पोलीस स्टेशनचा १ – असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये निंभोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढून सुरक्षेची भावना दृढ झाली आहे.